Tumhavin Datta mala kon tari | तुम्हाविण दत्ता मला कोण तारी | Shri Datta Stuti – Tumhavin Datta mala kon tari | गुरुवार हा दत्तगुरूंचा वार असल्याने या दिवशी स्तोत्राचे पठण करणे अत्यंत फलदायी आणि शुभ मानले जाते.
श्री दत्त स्तुती लिरिक्स
तुम्हाविण दत्ता मला कोण तारी!
यतीरुप दत्तात्रया दंडधारी l
पदी पादुका शोभती सौंख्यकारी ll
दयासिंधू ज्यांची पदे दुःखहारी l
तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ll१ll
पदे पुष्करा लाजवीती जयांची l
मुखाच्या प्रभे चंद्र मोहूनी याची ll
घडो वास येथे सदा निर्विकारी l
तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ll२ll
सुनीटा असती पोटऱ्या गुल्फ जानू l
कटी मौंजी कौपिंन ते काय वानू ll
गळा मालिका ब्रह्म सुत्रासी धारी l
तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ll३ll
गळा वासुकी भूषणे रुंडमाळा l
टिळा कस्तुरी केशरी गंध भाळा ll
जयाची प्रभा कोटी सुर्यासी हारी l
तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ll४ll
जटाभार माथा प्रभा कुंडलांची l
त्रयास्ते भुजा शास्त्र सायूध साची ll
त्रिशूळमाळादिक छाटीधारी l
तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ll५ll
कली पातला पातका वाढवाया l
तयाने जना मोहिले गाढ माया ll
जगी अवतरे दुःखहारा मुरारी l
तुम्हा विण दत्ता मला कोण तारी ll६ll
अनूसयासत्व हारावयासी l
त्रिमूर्ती जाता करी बाळ त्यांसी ll
निजे पालखी सर्वदा सौंख्यकारी l
तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ll७ll
प्रसिद्ध अती क्षेत्र तीर्थे तयांचा l
कली पातल्या जाहला लोप साचा ll
करी ततप्रसिद्धी मिषे ब्रह्मचारी l
तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ll८ll
मुखे वेद नीचाचिया बोलविले l
श्रीशैल्या क्षण तंतूकालांगी नेले ll
सुदेही करी विप्र कुष्ठा निवारी l
तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ll९ll
दरिद्री बहु कष्टला विप्र त्यासी l
क्षण द्रव्य देवोनी संतोषवीसी ll
दिला पुत्र वंध्या असूनी वृद्ध नारी l
तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ll१०ll
मनी इच्छी विप्रैक व्हाया अन्नदान l
असे जाणुनी कौतुका दावी पूर्ण ll
करी तृप्त लेशान्नी जो वर्ण चारी l
तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ll११ll
विलोकुनिया शूद्रभक्ती मनी ती l
कृपे दिधले पीक अत्यंत शेती ll
करी काशीयात्रा कुमारा अधारी l
तुम्हा विण दत्ता मला कोण तारी ll१२ll
नृपस्थानी रंकासही स्थापियेले l
मदे व्यापिले प्रिय नीर्गर्व केले ll
कृपादृष्टीने स्फोटकाते निवारी l
तुम्हा विण दत्ता मला कोण तारी ll१३ll
द्वीजाच्या घरी घेवडा वेल ज्याने l
मुळापासूनी तोडीला तो तयाने ll
दिली संतती संपदा दुःखहारी l
तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ll१४ll
शुष्क असुनी काष्ट ही वृक्ष केला l
गतप्राण तो पुत्र सजीव केला ll
औदुंबरी आवडे वास भारी l
तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ll१५ll
त्रीलोकी अशी कीर्ती केली अगण्य l
अगम्यागमा ख्याती ही ज्याची धन्य ll
स्मरे भक्तीने तदभव दुःखहारी l
तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ll१६ll
अनंतावधी जाहले अवतार l
परी श्रीगुरुदत्त सर्वात थोर ll
त्वरे कामना कामिका पूर्णकारी
तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ll १७ll
तपे तीर्थ दाने जपादी करीती l
स्वहीतार्थ ते दैवताला स्तवीती ll
परी केली कर्मे वृथा होती सारी l
तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ll१८ll
सदा आससी दत्त सर्वार्थकामा l
त्वरे भेटसी टाकुनी सर्व कामा ll
मना माझिया आवरी दैन्यहारी l
तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ll १९ll
मनी आवडी गायनाची प्रभूला l
करी सुस्वरे नित्य जो गायनाला ll
तयांच्या त्वरे संकटाते निवरी l
तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ll२०ll
असे क्षेत्र काशी शिवाची पुरी ते l
प्रभाती करी स्नान गंगातीरी ते ll
करी करविरी अंही भिक्षार्थ फेरी l
तुम्हा विण दत्ता मला कोण तारी ll२१ll
निशी जाय निद्रार्थ मातापुरासी l
सवे कामधेनू वसे तेजराशी ll
तसे श्र्वानरुपी सवे वेद चारी l
तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ll२२ll
जना मुक्तीचा मार्ग दावावयासी l
कळाया स्वरूपप्रचीती तयांसी ll
त्रीलोकी करी जो निमिषारर्धी फेरी l
तुम्हा विण दत्ता मला कोण तारी ll२३ll
असे रूप ठावे तुझे आसताना l
वृथा हिंडलो दैवते तीर्थ नाना ll
परी शेवटी पायी आलो भवारी l
तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ll२४ll
जधी जन्मलो नेणू दुःखासुखाला l
आयुरदार्य अज्ञानी तो व्यर्थ गेला ll
कळू लागता खेळलो खेळ भारी l
तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ll २५ll
तृतीयांश आयुष्य ऐसेची गेले l
परी नाही त्वन्नाम मी आठविले ll
अता यौवन प्राप्त झाले अपारी l
तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ll२६ll
परद्रव्य कांता पराची पहाता l
स्मरादी रीपू ओढिती मानसाsता ll
कसा ध्यावू तुते माधूकैटभारी l
तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ll२७ll
पुढे वृद्धता प्राप्त होईल वाटे l
तिच्या यातना देखता चित्त फाटे ll
कधी भेटसी केवी हो चक्रधारी l
तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ll२८ll
आयुष्यार्ध निद्रार्नवामाजी गेले l
पणा तीन शेषात ते जाण केले ll
तयांनी मना गोविले दुःख भारी l
तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ll२९ll
अशा घोर मायासमुद्रा पहाता l
भिवोनी पदी पातलो तुमच्याsता ll
तरी क्लेश चींतादी दुःखासि हारी l
तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ll३०ll
त्यजा मत्त पाखंड ते सज्जनाहो l
धरा मानसी भक्ती निष्ठा दृढा हो ll
भवाबूधीच्या नेई तो पैलपारी l
तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ll३१ll
स्वता घेतला दाखला सद्गुरुंचा l
तसा घेती ते आणि घेतील साचा ll
मन:कामना होतसे पूर्ण सारी l
तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ll३२ll
करी पाठ जो का स्तुती ही त्रीकाळा l
तयांच्या प्रतापे पडे भीती काळा ll
गुरु सर्व दारिद्र्य दुःखा निवारी l
तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ll३३ll
श्री गुरुदेव दत्त!श्री गुरुदेव दत्त!श्री गुरुदेव दत्त!
अर्थ
हे स्तोत्र म्हणजे भगवान दत्तात्रेयांच्या चरणी पूर्णपणे शरण जाऊन केलेली प्रार्थना आहे, ज्यात भक्त अत्यंत आर्ततेने म्हणतो की, “हे दत्तगुरू, या दुःखाच्या आणि मायेच्या भवसागरातून मला तुमच्याशिवाय दुसरे कोणीही तारू शकत नाही.” यात त्यांच्या दिव्य रूपाचे आणि अगाध लीलांचे स्मरण करून जीवनातील संकटे आणि अज्ञानातून मुक्ती मागितली आहे.
पार्श्वभूमी व महत्त्व
भगवान श्री दत्तात्रेय. हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश (शिव) यांचे एकत्रित स्वरूप असून त्यांना विश्वाचे ‘आदिगुरू’ मानले जाते. गुरुवार हा दत्तगुरूंचा वार असल्याने या दिवशी स्तोत्राचे पठण करणे अत्यंत फलदायी आणि शुभ मानले जाते.
सण आणि प्रसंग :- दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, तसेच ‘श्री गुरुचरित्र’ पारायण सप्ताहाच्या वेळी किंवा कोणत्याही शुभ प्रसंगी या स्तुतीचे विशेष पठण केले जाते.
कसे म्हणतात :- स्तोत्रातच सांगितल्याप्रमाणे “करी पाठ जो का स्तुती ही त्रिकाळा” – म्हणजेच शक्य असल्यास रोज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी (त्रिकाळ) याचे वाचन करावे. वेळेअभावी रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवपूजेच्या वेळी शांत मनाने, अत्यंत भक्तिभावाने आणि एकाग्रतेने याचे पठण करावे.
Song Credit
| Singer | Sanika Phadake |
| Music | Dev Avdhoot |
| Lyricist | Traditional |
| Label | Mohan Media Bhakti |

